Thursday 16 March 2017

अखेरचा रोमनॉव्ह


==========
आजच्या दिवशी बरोबर १०० वर्षांपूर्वी - म्हणजे १५ मार्च १९१७ ह्या दिवशी रशियाचा राजा (झार) दुसरा निकोलस ह्याने विरोधकांचे बंड सुरु असताना राज्यत्याग केला आणि ३०० वर्षे सलग चाललेल्या रोमनॉव्ह राजवटीचा शेवट झाला. सगळ्या वर्गातील रशियन जनता झारविरोधात पेट्रोग्राड (आताचे सेंट पीटर्सबर्ग) शहरात बंड करून उठली होती. विशेष म्हणजे ह्यात झारचे स्वत:चे सैन्यही होते!
काय कारणे होती ह्या बंडाची? थोडक्यात पाहूया. निकोलसच्या २३ वर्षांच्या राजवटीत रशियाचा जपानकडून दोनदा पराभव झाला होता. अन्नधान्य व इंधनाची अमाप टंचाई निर्माण झालेली होती - आणि त्यामुळेच रशियन जनतेला लोकनियुक्त लोकशाही सरकारची आस लागलेली होती.
१८९४ मध्ये झार तिसरा अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच ह्याच्या मृत्यूनंतर दुसरा निकोलस गादीवर आला. झारपदावर आल्यावर काही महिन्यांनी ह्याचे लग्न अलेक्झांड्रा फिओडोरोव्हनाशी झाले. (ही ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरीयाची नात होती!) ह्या जोडप्याला ४ मुली आणि एक मुलगा झाला. हे जोडपं आपल्या मुलांना घेऊन बरेचदा महाराणी व्हिक्टोरीयाला लंडनला भेटायला येत असे. महाराणीचा झारवर बऱ्यापैकी प्रभाव होता.
झार गादीवर येऊन १० वर्षे झाल्यावर १९०४ मध्ये जपानने पोर्ट आर्थरमधील रशियाच्या नौदलावर अचानक टॉर्पीडो हल्ला केला. युध्दाला तोंड लागले. रशियन नौदलाचे अपरिमित नुकसान झाले. जपानसारख्या लहान देशाची ही हिंमत पाहून रशियन लोकांचाही त्यांच्या सैन्यावरचा विश्वास उडाला. पुढे पुन्हा एकदा मार्च १९०५ मध्ये जपानने मुकडेन येथे हल्ला केला. त्यात सुमारे ९०००० रशियन सैनिक मारले गेले. रशियाला शरणागती पत्करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.
रशियन सैन्याची ही नामुष्की होत असताना रशियन जनता झारच्या विरोधात उठली होती. जानेवारी १९०५ मध्ये पीटर्सबर्गमध्ये सार्वत्रिक संप सुरु झाला होता. २२ जानेवारी १९०५ रोजी फादर जॉर्जी गॅपॉनच्या नेतृत्वाखाली एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या मोर्चात पुरुषांबरोबरच बायका व मुलेपण होती. जमावाने झारच्या विंटर पॅलेसवर जाऊन तक्रारींची यादी देणे फक्त इतकाच ह्या मोर्चाचा उद्देश होता. फादर गॅपॉन मोर्चाच्या अग्रभागी हातात क्रॉस आणि झारचे चित्र घेऊन चालत होता. पण झारने जमावाला घाबरून त्याच्या सैन्याला गोळीबाराचा आदेश दिला. सैन्याने ह्या निःशस्त्र जमावावर गोळीबार केला. २००० लोक मारले गेले. रशियाच्या इतिहासांत 'ब्लडी संडे' म्हणून ह्या घटनेची नोंद आहे.
लोकांचा विरोध कमी करण्यासाठी झारने लोकनियुक्त नेत्यांना रशियन संसद ड्यूमावर घेण्याची तयारी दाखवली. पण ह्याला काहीच अर्थ नव्हता. झार स्वत:चं मंत्रीमंडळ स्वत: नेमत होता आणि वर त्याला ड्यूमा कधीही बरखास्त करुन नवीन निवडणूका घ्यायचे अधिकार होते. लोकांमधील असंतोष कोणत्याही प्रकारे कमी झाला नाही.
१९१४ मध्ये पहिले महायुध्द सुरु झाले. रशियन सैन्य इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या मोहींमांसाठी तयारच नव्हते. स्वत: झारने १९१५ मध्ये रशियन सैन्याचे नेतृत्व स्वीकारले. ह्याचा दुसरा अर्थ लोकांच्या मनात हा झाला की सैन्याच्या सगळ्या पराभवांसाठी आणि ढिसाळ कामगिरीबद्दल झार जबाबदार होता. युध्दामुळे इंधन व अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. रशियन सैन्य महायुध्दातही कोणतीच दैदिप्यमान कामगिरी करत नव्हते. नैसर्गिकपणे लोकांचा झारबद्दलचा असंतोष शिगेला पोहोचला होता.
ह्या असंतोषाचे आणखीही एक कारण होते. ते म्हणजे ग्रीगोरी रासपुतिन आणि त्याचे झारबरोबरचे संबंध. रशियन वर्तमानपत्र रासपुतिनला थापाड्या आणि तोतया म्हणत असत. त्याला जर्मनांबद्दल प्रेम होते आणि त्याचे झारबरोबर चांगले संबंध होते. जर्मनी युध्दात लाखो रशियन सैनिकांचा संहार करत होती आणि त्यामुळेच जर्मनप्रेमी रासपुतिनचे झारबरोबरचे संबंध लोकांच्या डोळ्यात येत होते आणि त्यांचा झारवरचा विश्वास हळूहळू उडू लागला होता. झार हाच रशियन साम्राज्याला धोका असल्याचा समज पसरु लागला होता. ह्याचा बंदोबस्त करायचे जनतेने ठरवले.
डिसेंबर १९१६ मध्ये रासपुतिनचा खून झाला. २-३ महिन्यातच झारविरोधी आंदोलन रशियात सुरु झाले. सैन्याला बंड मोडण्यासाठी पाचारण केले गेले पण उलट तेच बंडात सामील झाले. ह्याने बंडाची शक्ती अमाप वाढली. त्यांच्याकडे आता हत्यारे आली. विरोधकांचे सरळसरळ खून करण्यात आले. राजबंद्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आले.
झारने ड्यूमा बरखास्त करायचा एक प्रयत्न करून पाहिला पण लोक एेकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रॉडझिआंकोच्या नेतृत्वाखालील जनतेने झारच्या विंटर पॅलेसवर कब्जा केला. शेवटी लोकांच्या दबावाखाली येऊन १५ मार्च १९१७ रोजी झार निकोलसने त्याच्या घराण्याकडे ३०० वर्षे असलेल्या सिंहासनाचा त्याग केला आणि रशियन राज्यसत्ता संपुष्टात आली.
(झार व त्याच्या कुटुंबाला टोबॉल्स्क येथे हलवले गेले. तेथून पुढे ते सगळे येकाटेरीनबर्ग येथे रहायला गेले. नोव्हेंबर १९१७ मध्ये बोल्शेव्हिक राज्यक्रांती सुरु झाली. ह्या बोल्शेव्हिकांनी जुलै १९१८ मध्ये येकाटेरीनबर्ग येथेच झार व त्याच्या संपूर्ण परिवाराची कत्तल केली. अशा प्रकारे हा ३०० वर्ष जुना रोमनॉव्ह राजवंश अखेर संपला!)
- संकेत कुलकर्णी (लंडन)
फोटो १: झार निकोलस दुसरा १९०९ मध्ये
फोटो २: झार त्याच्या कुटुंबासोबत
 https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/1927160230903855/